सृजन फाऊंडेशन, श्रीक्षेत्र देहू
सन २०१९ मध्ये सृजन फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू मध्ये ‘अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल’ चा शुभारंभ झाला. शाळेच्या आदरणीय प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शाळेचा प्रवास सुरु झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनात घेऊन कृतिशील नियोजन सुरु झाले.
शाळेतील प्रत्येक घटक… विद्यार्थी मनावर प्रभाव टाकत असतो. विद्यार्थ्यांची कोवळी मने सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीतून संस्कारित होत असतात. या मनामनांतून ज्ञानाचे अंकुर बहरावे… विश्वात्मक भावनेने मन समृद्ध व्हावे… विज्ञानाशी अध्यात्माचा सुंदर समन्वय साधणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे… यासाठी नियोजनपूर्वक उपक्रमांची मांडणी करण्यात येत आहे.
माझी या शिक्षण व्यवस्थेसंबंधी कायम एक प्रांजळ भावना आहे… “शाळेच्या भौतिक सुविधा हा देह असेल तर शिक्षक हा या विद्यालयरूपी देहाचा आत्मा आहे.” शिक्षकांची गुणसंपदा हे शाळेचे शक्तीस्थान असते. शिक्षकांच्या ज्ञानदान व समर्पण भावनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असतो.
आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आले आहे. यामध्ये ‘मुलांनी केवळ शिकणे महत्त्वाचे ठरणार नाही तर कसे शिकायचे… हे शिकणे… जास्त महत्वाचे ठरणार आहे. विचार कसा करायचा आणि त्यातून समस्या कशा सोडवायच्या’, अशा नवनवीन संकल्पना घेऊन शिक्षण प्रक्रिया विकसित होत आहे.
विद्यार्थ्यांची प्रयोगशील व कृतिशील वृत्ती विकसित व्हावी यासाठी रोबोटिक लॅब, सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. भविष्यातील वैज्ञानिक होण्याचे स्वप्नबीज शाळेतच त्यांच्या मनावर रुजले जाईल, हीच यामागील भावना आहे. तसेच ग्रंथालय आणि संगणक कक्ष मुलांच्या जीवनाला नवे पैलू पाडत आहेत.
सृजनदीप व्याख्यानमाला हा संस्थेचा उपक्रम विद्यार्थी व पालकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. सर्वांच्या एकात्म भावनेतूनच या ज्ञानमंदिराची सृजनशील वाटचाल सुरु आहे. या प्रवासात सहयोग देणाऱ्या प्रत्येकाविषयी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.