'Education with Character'
हे ब्रीदवाक्य मनात घेवून 'शिक्षणातून चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडावा' या विचारध्येयाने ‘अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल’ मधील प्रत्येक उपक्रम कार्यान्वित होत आहे.
ज्ञानसंपन्नेतून जीवनात अलेली ही सेवापरायणता जीवनाला सुंदर अर्थ प्राप्त करून देत असते. यासाठीच ज्ञानाला मूल्य संस्कारांचे अधिष्ठान देणारे शिक्षण असणे महत्वाचे ठरते. शाळेच्या आदरणीय प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक शिक्षक मूल्याधिष्ठीत शिक्षणप्रणाली रुजविण्यासाठी येथे मनापासून कष्ट घेत आहे... याचे आम्हांस मनापासून कौतुक आहे.
शिक्षणातून विद्यार्थ्यांचा बौद्धीक, मानसिक व शारिरीक विकास होणे महत्त्वाचे असते. या सर्वांगीण विकासासाठी अतिशय संवेदनशीलतेने अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रमांचे नियोजन केले जाते.
या वचनाप्रमाणे अभ्यासाची प्रवृत्ती विद्यार्थी मनात विकसित व्हावी. एखाद्या झाडाचे मूळ ज्याप्रमाणे कठिण अशा खडकाला देखील भेदून जाते, त्याप्रमाणे या जगातील कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट सातत्यशील अभ्यासाने शक्य होते... सिद्धीस जात असते. हा प्रयत्नवाद जेव्हा कोवळ्या मनात अंकुरतो... त्या क्षणापासून अनेक संभावनांचे त्यांच्या जीवनातून दर्शन घडते. अशा भावनिक विकासासाठी प्रयोगशीलता हे शाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
श्री. विकास कंद
सचिव,शाळेतील उपक्रमांसंबंधी एक सुंदर उदाहरण मला सांगावसे वाटते, ‘रक्षाबंधन’ हा सण शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून साजरा केला. उपक्रम लहान आहे पण यातून व्यक्त होणारा अर्थ खूप मोठा आहे. संवेदनशीलतेचा भाव विद्यार्थी मनात सहजपणे जागृत करणारा उपक्रम आहे.
साने गुरुजी म्हणतात, "मला शिक्षणाचं यश केवळ साक्षरतेचं प्रमाण किती वाढलं... यावर मोजावसं वाटत नाही... समाजातील संवेदनशीलतेची पातळी किती वाढली... यावर ते मोजायला हवे."
तल्लख बुद्धीमत्तेसह संवेदनशील मन विकसीत होणे, हे शिक्षणाचे महत्वाचे ध्येय लक्षात घेऊन शाळेचे कार्य घडत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातून सुंदर जगण्याचे दर्शन घडावे, यासारखा दुसरा आनंद नाही.
याशिवाय शारिरीक शिक्षणातून एक सदृढ आरोग्य संपन्न शरीर घडावे, यासाठी संबंधित शिक्षक विशेष प्रयत्नशील आहेत. कारण आरोग्यसंपन्न देहातच एक सुंदर मन वास करीत असते. यासाठी शरीर संपदेचे महत्व लहान वयातच विद्यार्थ्यांना लक्षात यावे यासाठी अगदी जागृततेने कार्य केले जाते. आज विविध खेळातील विद्यार्थ्यांचे प्राविण्य व कुशलता पाहून भविष्यातील या पिढीचे उज्वल भविष्य लक्षात येते.
एका सर्वांग सुंदर व्यक्तिमत्वातून एक चारित्र्यसंपन्न विद्यार्थी जीवन घडावे यासाठीच कृतीयुक्त आनंददायी शिक्षणप्रणाली येथे कार्यरत आहे.